पुणे : जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीणगाव जिल्हा परिषद शाळेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना जबर मारहाण करुन त्यांना तिखट मिर्च्या खायला दिल्याचा आरोप पालकांनी शिक्षकांवर केला आहे. याघटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित होतो. शिक्षणाचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुण्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
राहुल हिवरे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
माळीणगावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राहुल हिवरे हे शाळेतील मुलांना मारहाण करत असे. तसेच स्वत: वडापाव खावून शिल्लक राहिलेली तिखट मिरची मुलांना खायला लावली. हा प्रकार इथेच थांबला नाही. पोषण आहारातील भात मुलांच्या दप्तरात टाकला गेला आहे. तसेच तंबाखू मुलांच्या डोक्यावर टाकण्याचा प्रकार शिक्षक राहुल हिवरे करत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच मद्यपान ते करत असल्याचा आरोपही केला.
याबाबत पालकांकडून शिक्षकाविरोधात पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.