Talathi Bharati : राज्यात तलाठी भरतीची परीक्षा नुकतीच पार पडली आहे. तब्बल आठ लाख विध्यार्थी तलाठी भरती परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याची शक्यता अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे.
बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ उमेदवारांकडून आलेले आक्षेप आणि १४६ प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब झाला आहे. या परीक्षेसाठी साडेअकरा लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ एवढे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली.
परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत मुदत देण्यात आली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदवण्यात आले. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत.
कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय व्हायला नको म्हणून अगदी काटेकोरपणे, कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील दोन दिवसांत निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल. तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे”, असे तलाठी भरती परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके म्हणाल्या.