पुणे : बीडमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. सुरेश धस यांनी बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख करत अनेक अभिनेत्रींचीही नाव घेतली आहेत. यात अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचाही समावेश आहे. सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना चांगलेच सुनावले आहेत.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचे चारित्र्य आणि त्यांच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमी काळजी घेतली आहे. राजकीय वाद सुरू आहे. यामध्ये सामाजिक आणि संवेदनशीलपणा देखील आहे. या प्रकरणात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही. सुरेश धस यांना आज मी फोन करणार आहे. सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये. प्राजक्ता माळी यांनी देखील काल प्रेस घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी सुरेश धस यांना स्वतः विनंती करणार आहे. पार्टीचा आमदार असून देखील तुम्ही असं काम करत आहे. तुम्ही असं करू नये, असे म्हणत त्यांनी सुरेश धस यांना चांगले खडेबोल सुनावले आहेत.
मात्र, देवेंद्र फडणवीस कोणालाही सोडणार नाहीत..
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सहा दिवसाच्या अधिवेशनात चार ते साडेचार तासाच्या चर्चेसाठी वेळ दिला. सर्वांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी रिप्लाय दिला, त्यात त्यांनी कोणताही शंका ठेवलेली नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की, मी कोणाचाही मुलायजा ठेवणार नाही. त्यानुसार ते पावलं उचलत आहेत. प्रत्येकाने भावना व्यक्त करणे यात काही गैर नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस कोणालाही सोडणार नाहीत, असे त्यांनी म्हटले.