पुणे : महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त आणि IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. ठिकठिकाणी छापे टाकून अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी त्यांचे विभाग कडक पावले उचलत आहे. मुंढे यांच्या या धडक कारवाईनंतर आता देशातील सर्वोच्च अन्न नियामक संस्था ‘एफएसएसएआय’ देखील पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आली आहे.

FSSAI ने थेट क्विक कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘स्विगी इन्स्टामार्ट’ला मोठा झटका दिला आहे. ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे आणि आरोग्यासाठी घातक असणारे अन्नपदार्थ पुरवल्याप्रकरणी संस्थेने कंपनीला तब्बल 9 कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. इन्स्टामार्टवरून ग्राहकांना मुदत संपलेली अंडी, सडलेले अन्न, दुर्गंधीयुक्त प्रोटीन पावडर आणि अत्यंत संवेदनशील असलेल्या लहान मुलांचे असुरक्षित दूध पुरवण्यात आल्याचा गंभीर आरोप या नोटिसीमध्ये ठेवण्यात आला आहे.

अनेक ग्राहकांनी यापूर्वी खराब अन्नाबाबत कंपनीकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, कंपनीने समस्येचे मूळ निवारण करण्याऐवजी ग्राहकांना फक्त पैशांचा परतावा (रिफंड) देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, एका ग्राहकाने परत केलेले खराब उत्पादन दुसऱ्या ग्राहकाला पाठवल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.
या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत FSSAI ने स्विगी इन्स्टामार्टला लेखी स्पष्टीकरण आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भविष्यात अशा चुका होणार नाहीत, यासाठी काय उपाययोजना केल्या याचा ‘अनुपालन अहवाल’ मागवला आहे.
दुसरीकडे, राज्यांच्या अन्न व औषध प्रशासनामार्फत कायदेशीर कारवाईसाठी नमुने गोळा केले जात आहेत. अशा निष्काळजी कंपन्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांची नावे सोशल मीडियावर जाहीर केली जात आहेत. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईनंतर आता FSSAI ने उचललेल्या या पावलामुळे भेसळखोर आणि नियम मोडणाऱ्या ब्रँड्सचे धाबे दणाणले आहेत.








