सुरेश घाडगे
परंडा : तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचे संततधार पाऊस व अतिवृष्टी यामुळे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे. याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी महेश तिर्थकर यांना लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, पै विठ्ठल चव्हाण, गणेश चव्हाण यांनी बुधवारी (ता. १४) निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, पहिल्या टप्प्यात परंडा तालुक्यातील केवळ जवळा (नि.) महसूल मंडळ काही हातांवर मोजण्या एवढीच शेतकरी संख्या घेतली असून तालुक्यातील इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. परंडा तालुक्यात ३ जुलै पासून सलग २७ दिवस पाऊस पडला आहे. मध्यंतरी सप्टेंबर महिन्यात ५ ते ६ दिवस पाऊसाने उघडीप दिली. परंतु सप्टेंबर महिन्यात ८ ते १३ तारखेला तालुक्यातील महसूल मंडळ मध्ये अतिवृष्टी झाली व शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सततच्या पावसाने उडीद, सोयाबीन, मुग, तुर, मका, फळबागा आदी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.