पुणे : जिल्ह्यातील चारही लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सोमवारी पुण्यात सभा होत आहे. पंतप्रधान मोदींच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर येरवडा (Yerawada Police) पोलिसांनी एका संशयिताला पकडले आहे. अब्दुलाह रुमी (48 रिलॅक्स पीजी सर्व्हिसेस, सोमनाथनगर, वडगाव शेरी) असे संशयिताचे नाव आहे. संशयित हा बनावट आधारकार्ड, मतदार ओळखपत्र बाळगला असल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. त्या संशयिताची चौकशी सुरु आहे.
सहायक पोलिस निरीक्षक महेश लामखेडे यांनी याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित रुमी हा तामिळनाडू येथील रहिवासी आहे. पंतप्रधानांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संशयितांची माहिती घेण्यात येत आहे.
येरवड्यातील गोल्फ क्लब चौकाजवळ एक संशयित थांबला आहे. त्याच्याकडे बनावट आधारकार्ड आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. संशयिताकडे बनावट आधारकार्ड, मतदार ओळखपत्र असल्यामुळे पोलिसांच्या पथकाने त्या संशयिताला ताब्यात घेतले आहे.
संशयित रुमीने बनावट नावाने आधारकार्ड, मतदार ओळखपत्र का बनवले असेल, या दृष्टीने त्याचा तपास सुरु आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दोडमिसे तपास करत आहेत.