बीड : “अमोल मिटकरी तू लहान आहे. कोणाच्या नादी लागतोय?. या रगेलच्या नादी लागू नको नायतर तुझे लय अवघड होईल”, असे म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बीड येथील पत्रकार परिषेदत धस बोलत होते. त्यावेळी त्यांनी मिटकरींवर जोरदार हल्लाबोल केला.
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, ” संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या प्रकरणातील आरोपी सापडले पाहिजेत हे आमचं मत आहे. वाचवण्यासाठी कोणीही येणार नाही. माझे आणि वाल्मिक कराड यांचे कसे सुमधुर संबंध होते याबद्दल मी उद्या स्पष्टपणे सांगणार आहे. धनजय मुंडे तुमच्याबरोबर देखील माझे संबंध होते, का बिघडले सांगा म्हणाव. कोण अमोल मिटकरी? अमोल मिटकरी तू कोणाच्या ही खिशात हात घाल माझ्याकडे यायचा प्रयत्न करू नको. या आगीत तेल ओतण्याचे काम तू करू नको, असा सल्लाही अमोल मिटकरी यांना दिला.
याबरोबरच इतर काही बाबतीत नवीन एसपी यांना कोण कशा पद्धतीने वागत हे सांगितलं पाहिजे. येथील काही पोलीस हे आकाने नेमणूक केल्याने संपूर्ण माहिती आकाला पुरवतात. हे होणं अत्यंत घातक आहे. पोलीस दल आरोपींना मदत करत असेल तर हे खूप अवघड आहे. आकापर्यंत पोहोचेपर्यंत माहिती त्याच्यापर्यंत पोहोचते आणि आका पुढे जातो. पीक विमा, राख, गायरण जमीन ढापण्याचा पॅटर्न आम्ही सांगितलं, उद्या अजून लोकं येणार आहेत त्यांच्यासमोर अजून पॅटर्न सांगू, असेही सुरेश धस म्हणाले.
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, आम्ही बघत असतो रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी, सपना चौधरी यांचे जे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे. थर्मल मधून जी राखेची गाडी निघते त्यावर कोणीतरी टोल वसूल करतात. आम्ही मोर्चात सहभागी होणार आहोत. नाही आले कोणी तर धनुभाऊ आपले विमान खाली आणा. तुम्हाला पालकमंत्री व्हायचे आहे. आमचं लेकरु मेला त्याला न्याय द्यायचा आहे. तुला कोणी घेरले आहे? हा काही राजकीय विषय नाही. या मोर्चात वंजारी समाजाचे लोक आणि मुस्लिम लोक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितलं.