मुंबई: बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे राज्यातील राजकारणात मोठा राडा सुरू असल्याच पाहायला मिळत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी या मुद्द्यावरून मोठं रान उठवलंय आहे. अशातच बीड प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारे सुरेश धस यांनी आज सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. सुरेश धस यांच्याकडून वाल्मिक कराडवर सातत्याने आरोप केले जात आहेत. अश्यात अजित पवार आणि सुरेश धस यांच्यातील बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
धसांची दुसरी भेट कश्यासाठी?
सोमवारी रात्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सुरेश धस यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. सुरेश धस हे पुरावे नसताना बोलत आहेत, अशी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केल्यानंतर सलग दोन दिवस यांच्यात भेटी होत आहेत. या भेटीत सुरेश धस यांना समज दिला जाईल असं वाटत असताना, सुरेश धस यांची दुसऱ्यांदा होणाऱ्या भेटीमुळे हे प्रकरण वेगळ्या वळणावर जात असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या भेटीत सुरेश धस यांनी अजित पवार यांना त्यांच्या जवळ असलेले पुरावे दिल्याची शक्यता वर्तवीली जात आहे.
पीक विम्यात घोटाळा झाल्याचा धसांचा आरोप
या शिवाय धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या काळात पीक विम्यात घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता. त्याबाबत पुरावे अजित पवार यांना दिले असल्याची माहिती मिळत आहे. अशातच आज सुरेश धस यांनी अजित पवार यांची भेट घेऊन उपसा सिंचनासाठी अधिगृहीत केलेल्या जमिनीची रक्कम लवकर देण्याबाबत चर्चा झाल्याचे स्वत: सुरेश धस यांनीच सांगितलं आहे.
दरम्यान, सुरेश धस यांनी हीच माहिती कालच्या भेटीत अजित पवारांना दिली असती त्यासाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेट घेण्याचं कारण नव्हतं. त्यामुळे सुरेश धस आणि अजित पवार यांच्या दुसरी बैठक कशासाठी झाली? बैठकी मागचं नेमकं कारण काय होतं? असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळात धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता तर नाही ना? असा सवाल देखील राजकीय वर्तुळात निर्माण होत आहे.