पुणे : सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने ‘स्पोर्ट्स मॅनिया-२०२२’ ही भव्य क्रीडा स्पर्धा व महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येत्या शनिवारपासून (दि. १२) या ‘स्पोर्ट्स मॅनिया’ला सुरुवात होत असून, खराडी हौसिंग सोसायटीज वेल्फेअर असोसिएशन (केएचएसडब्ल्यूए), पुणे नेक्स्ट यांचे या स्पर्धेला सहकार्य लाभले आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक सुरेंद्र पठारे यांनी दिली.
सुरेंद्र पठारे म्हणाले, “पूर्व पुण्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी, खेळाडूंना स्पर्धात्मक वातावरणात आपले कौशल्य आजमवण्यासाठी, आपल्या भागातून पदकविजेते खेळाडू घडविण्याकरिता तसेच नागरिकांना क्रीडा स्पर्धांचा आस्वाद घेता यावा यासाठी ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’तर्फे ‘एसपीएफ स्पोर्ट्स मेनिया २०२२’ या क्रीडा स्पर्धांचे १२ नोव्हेंबर २०२२ ते १८ डिसेंबर २०२२ दरम्यान पूर्व पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. पुण्याच्या पूर्व भागात होणारी ही सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असणार आहे.”
“या ‘स्पोर्ट्स मॅनिया’मध्ये लॉन टेनिस, बॉक्स फुटबॉल (१९ नोव्हेंबर), स्केटिंग, टेबल टेनिस (२० नोव्हेंबर), बॅडमिंटन, कॅरम (२६ व २७ नोव्हेंबर), व्हॉलीबॉल, स्विमिंग (३ व ४ डिसेंबर), बुद्धिबळ (१० व ११ डिसेंबर), क्रिकेट (डिसेंबर) या खेळांचा थरार रंगणार आहे. विविध वयोगट, महिला व पुरुष अशा गटात, तर एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी, सांघिक अशा स्वरूपात या स्पर्धा होतील. प्रत्येक खेळातील विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. “स्पर्धेत सहभाग व अधिक माहितीसाठी संस्थेच्या ९६०७०६०१९५ या दूरध्वनीवर संपर्क साधावा,” असे पठारे यांनी नमूद केले.