Supriya Sule Vs Sunil Tatkare : मुंबई : पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. तटकरे यांना अपात्र करण्यासाठी ४ जुलै रोजी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, आजपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने, खंत व्यक्त करत, खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. पक्षविरोधी कृती केल्याने, परिशिष्ट दहानुसार सुनील तटकरे यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांना केली आहे.
सुळे यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये चार महिने उलटून देखील कोणतीही कारवाई न झाल्याने परिशिष्ट दहाचे उल्लंघन होत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी ४ जुलै रोजी याचिका दाखल केली होती. मात्र, आजपर्यंत त्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.
पत्रात उलेल्ख केल्यानुसार, पक्षाच्या या दोन खासदारांनी राष्ट्रवादीची विचारसरणी बाजूला सारली आहे. स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी या नेत्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे. राष्ट्रवादीला दिलेल्या मतांना न जुमानता त्यांनी मतदारांचाही विश्वासघात केला आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या १० व्या परिशिष्टानुसार, पक्षांतरबंदी कायद्यांअंतर्गत या नेत्यांवर तत्काळ अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती.