पुणे : राष्ट्रवादी अजित पवार गटात राज्यसभेसाठी गेले काही दिवसांपासून खलबतं सुरू होती. अजित दादा राज्यसभेवर कोणाची वर्णी लावणार अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. त्यासाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांची नावं राज्यसभेच्या उमेदवारीसाठी स्पर्धेत होती. अशातच आता राज्यभेसाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांची नावं राज्यसभेच्या उमेदवारीसाठी स्पर्धेत असली तरी सुनेत्रा पवार यांचंच नाव आघाडीवर होत. अखेर सुनेत्रा पवार ह्याच राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाणार यावर शिक्कामोर्तब झालं. आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री उशिरा अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या देवगिरीवर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आज दुपारी दीड वाजता सुनेत्रा पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत .
‘ही’ नावे होती चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी पार्थ पवार, सुनेत्रा पवार, बाबा सिद्दिकी, समीर भुजबळ, आनंद परांजपे यांची नावं चर्चेत असताना, सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून घेण्यात आला आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांची नाराजी ओढवून, घराणेशाहीचा आरोप स्वीकारुन, अजितदादांनी घरातलाच उमेदवार दिला आहे, आता अजित पवारांची ही खेळी किती यशस्वी ठरते. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रतिष्ठेच्या केलेल्या बारामतीच्या लढतीत सुप्रिया सुळेंकडून सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांनतर राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा अशी मागणी पुणे आणि काटेवाडीच्या समर्थकांनी अजित पवार गटाकडे केली होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच नाव निश्चित करण्यात आले आहे.