अजित जगताप
कोल्हापूर : १३५० वर्षाहून अधिक परंपरा लाभलेल्या सिद्धगिरी मठ, कणेरी, कोल्हापूर येथे ‘सुमंगलमपंच महाभूत लोकोत्सव’ दि. २० फेब्रुवारी २०२३ ते दि. २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत होणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत सिद्धगिरी मठाचे ४९ वे अधिपती पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी दिली.
मठाने आजपर्यंत आध्यात्मासोबातच विज्ञान अनुषंगाने कृषी, पारंपरिक शिक्षण, आरोग्य, महिलासबलीकरण, संस्कृतीरक्षण, गो-स्वर्धन, संशोधन आणि आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. याच शृंखलेत ‘पर्यवरणरक्षणासाठी’ जगाला दीपस्तंभा प्रमाणे दिशादर्शक होईल असा सुमंगलम पंचमहाभूतलोकोत्सव आयोजित केला आहे.
आज पर्यावरण हानीच्या अनेक घटना आपण पाहत आहोत. त्सुनामी, अति वृष्टि, भूकंप, महापूर या सारख्या अनेक समस्याना आज जगाला तोंड द्यावे लागत आहे. येणाऱ्या काळात जगाला गंभीर पर्यावरणीय समस्याना सामोरे जावे लागू शकते. यासाठी आपण जागृती करणे गरजेचे आहे.
ही गरज ओळखून पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेनुसार कोल्हापुरातील सिद्धगिरी मठ येथे सुमंगलम् हा पर्यावरणीय लोकोत्सव होत आहे. सुमारे साडेसहाशे एकर क्षेत्रात उत्सवाची तयारी सुरू आहे. हजारो स्वयंसेवक, कारागीर परिश्रम घेत आहेत. या उत्सवाला ५ ते १० लाख लोक सहभागी होतील अशी शक्यता ग्रहित धरून नियोजन सुरु आहे.
या लोकोत्सवात प्रामुख्याने पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या तत्वाचे मूळ स्वरूप, त्यात मानवाने केलेले अतिक्रमण व भविष्यात आपण पुनः ही तत्व मूळ स्वरूपात आणण्यासाठी करावयाची उपाययोजना यासाठी जागृतीचा जागर सात दिवस केला जाणार आहे.
यासाठी प्रत्येक तत्वाच्या प्रदर्शनी (गॅलरी) उभारण्यात आलेल्या आहेत. भारतीय परंपरा आणि जीवन शैली यांचे जतन करत येणाऱ्यां पिढीला आपण सात्विक जीवन प्रदान करणे यासाठी विविध माध्यमांच्याद्वारे प्रदर्शनी (गॅलरी) सिद्धगिरी मठावर साकार होत आहेत.
हा पर्यावरण रक्षणाचा संदेश अधिक प्रभावीपणे निश्चितच पोहचणार आहे तसेच भारताच्या परांपरीक ज्ञानाची व त्यासंबंधी विविध संशोधन कार्याची ओळख सहभागी लोकांना होणार आहे. समाजाभिमुख कार्य करणारा मठ म्हणून सिद्धगिरी मठाकडे आज पाहिले जाते.
या उत्सवात पारंपरिक सेंद्रिय पद्धतीच्या शेतीचे रोल मॉडेल प्रत्यक्षात पाहता येणार आहे. देशी बियाणे, जैवीक खत, जैविक किड नियंत्रक प्रक्रिया समजून घेता येणार आहेत. त्यामुळे रासायनिक विषमुक्त अन्न-धान्याकडे टाकलेले ते एक समग्र पाऊल ठरेल.
तसेच देशात पहिल्यांदाच देशी प्रजातीच्या गाई, म्हैशी, बकऱ्या, घोडे, गाढव , कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन हि भरवण्यात येणार आहे. त्यामुळे देशी जातीच्या प्रजातींचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होईल.
या उत्सवात देश भरातील परंपारिक वैद्य सहभागी होणार असून लुप्त होणारी भारतीय चिकित्सा पद्धत टिकवण्यासाठी वैद्यांचे संमलेन होणार आहे. भारतीय चिकित्सा पद्धतीचा लाभ हि उत्सवासाठी येणाऱ्या लोकांना घेता येईल.
या उत्सवात जगभरातील नामवंत संशोधक, अभ्यासक आवर्जून या उत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासह ५०० विद्यापीठांचे कुलगुरू, देशभरातील हजारो संत-महंत, विविध समाज सेवी संस्था यांना निमंत्रण दिले आहे. लाखो लोकांना जेवण, पाणी, आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले आहे.
या उत्सवात सहभागी होणाऱ्या लोकांना काडसिदेश्वर स्वामीजींनी सोबत एक किलो प्लास्टिक कचरा सोबत आणण्याचे आवाहन केले आहे. येथे गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून रिसायकलिंग युनिटद्वारे त्या कचऱ्याचे पुनर्निमिती प्रक्रिया लोकांना पाहता येणार आहे. यामुळे समाजातील युवकांना एक नवीन दिशा निश्चितच मिळू शकते वयामाध्यमातून प्लास्टिक कचऱ्याच्या भीषण समस्यांना एक पर्याय मिळू शकतो.
या उत्सवाच्या पूर्व संध्येला म्हणजेच दि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी कोल्हापूर शहरातून ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या’ पार्श्वभूमीवर भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत कोल्हापूर शहरात प्रथमच अनेक राज्यातील विविध कलाविष्कार पाहायला मिळणार आहेत.
तसेच या उत्सवात अनेक चित्ररथ हि सहभागी होणार असून हि शोभायात्रेचा समारोप पंचगंगा घाट येथे होणार असून यावेळी पंचगंगा नदी आरती होणार आहे. या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस यशोवर्धन बारामतीकर, गुंडू वडड, डॉ. संदीप पाटील, माणिक पाटील चुयेकर, बापू कोंडेकर, शंकर पाटील, विमल सिंग, विवेक सिद्ध, दीपिका पाटील, त्रिशूल पाटील, अक्षय जहागीरदार, सागर गोसावी, राजा मकोटे व मठाचे प्रतिनिधी, सेवेकरी उपस्थित होते.