जळगाव : जळगावच्या एरंडोलमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या नऊ वर्षीय मुलीसह गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी २६ डिसेंबर रोजी एरंडोलमधील जहांगीरपुरा परिसरामध्ये दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मानसिक तणावातून महिलेने हा निर्णय घेतल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. सपना माळी (वय-३३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर तिच्या मुलीचे नाव केतकी माळी (वय-९) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना माळी या मृत महिलेचा आठ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती आपल्या मुलीसह माहेरात राहायला आली होती. या दोघी माय-लेकी एरंडोलमधील महादेव मंदिर परिसरात राहत होत्या. सपना हिचा भाऊ दुपारी त्यांच्या घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली आली. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत या प्रकरणी तपास केला.
दरम्यान, या आत्महत्यामागे मानसिक तणाव असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळी तपासादरम्यान पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, असे नमूद करण्यात आलेले आहे. त्यावरून मृत महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी ही चिठ्ठी लिहिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.