मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार राम पंडागळे यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयेश राम पंडागळे (वय -३९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कांदिवली पूर्व येथील लोखंडवाला परिसरातील एका आलिशान अपार्टमेंटमधील राहत्या घरात जयेशने छताला गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं आहे. बेरोजगारीला कंटाळून त्याने आपली जीवनयात्रा संपवली, असा पोलिसांना संशय व्यक्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश हा रविवारी (दि. १३) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झोपायला जातोय, असं सांगून त्याच्या बेडरूममध्ये गेला. मात्र, तो बराच वेळ बाहेर न आल्याने त्याच्या आईने त्याला हाक मारली, पण त्याच्या खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर जयेशच्या कुटुंबातील लोकांनी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या बेडरूमचा दरवाजा तोडला असता तो छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.