ऊसाचे पाचट न जाळता पाचटकुट्टी करुन खोडवा व्यवस्थापन करावे : कृषी अधिकारी सुरज जाधव
बापू मुळीक / सासवड : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने मौजे मावडी क.प येथे 1 जानेवारीला तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत धायगुडे, कृषि पर्यवेक्षक प्रविण अडसुळ व प्रमोद खेडकर यांच्या उपस्थितीत राजाराम अनंता भामे यांचे प्रक्षेत्रावर ऊस पाचट व्यवस्थापन विषयी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
शेतकऱ्यांनी ऊस तुटून गेल्यानंतर उसाचे पाचट न जाळता त्याचे पाचट व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जेणेकरून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढेल. तसेच जमिनीची सुपीकता वाढून जमिनीचा पत सुधारेल. उसाची तोडणी झाल्यानंतर उसाचे पाचट कुट्टी करून उसाचे बुडक्यावरील पाचट बाजूला सारून कोयत्याने जमिनीलगत बुडके छाटणी करावी.
त्यामुळे फुटव्यांची संख्या वाढते आणि उत्पादनात वाढ होते. त्यानंतर प्रति हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट तसेच दहा किलो पाचट कुजवणारे जिवाणू मिसळून टाकावे. जेणेकरून पाचट लवकर कुजेल. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस पाचट व्यवस्थापन करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी सहाय्यक स्नेहलता जाधव यांनी केले. त्यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.