बीड : संतोष देशमुख हत्येप्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल असेलला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आला होता. ३१ डिसेंबर रोजी पुण्यातल्या सीआयडी कार्यालयात कराडने ज्या गाडीतून शरणागती पत्करली त्या गाडीवरुन आता वादंग उठलं आहे.
ज्या पांढऱ्या स्कॉर्पिओ गाडीमधून वाल्मिक कराड पुण्यातल्या सीआयडी कार्यालयात हजर झाला होता, तीच गाडी अजित पवारांच्या ताफ्यातील असल्याचे आरोप होत आहेत. अजित पवार जेव्हा मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी गेले होते, तेव्हा हीच गाडी ताफ्यात होती असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.
कारण आम्ही अण्णाचे कार्यकर्ते आहोत..
दरम्यान, पांढऱ्या स्कॉर्पिओचे मालक शिवलिंग मोराळे यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, मीडियाच्या माध्यमातून मला कळालं अण्णा सरेंडर होणार आहेत. आम्हाला रहावलं नाही, कारण आम्ही अण्णाचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे ३१ तारखेला सकाळी मी सीआयडी ऑफिसचा पत्ता विचारत विचारत तिथे गेलो. तिथं आम्हाला थांबू दिलं नाही, त्यामुळे एक-दीड किलोमीटर लांब जाऊन थांबलो. असे मोराळे म्हणाले.
मोराळे पुढे म्हणाले की, अचानक मला रस्त्यात वाल्मिक अण्णा दिसले. माझी गाडी बघून तेच थांबले, मला त्यांनी हात केला.. मी सुरुवातीला घाबरल्यासारखो झालो. ते म्हणाले, छोट्या गाडीत त्रास होतो, मला सीआयडी ऑफिसला नेऊन सोड. मग मी त्यांना गाडीत बसवून सीआयडी ऑफिसला सोडले. त्यानंतर मी तिथून निघून आलो.
माझी नार्को टेस्ट करा : मोराळे
मोराळे पुढे म्हणाले की, माझी नार्को टेस्ट करा, मी कशालाही तयार आहे. दुधाचं दूध पाण्याचं पाणी होऊ द्या. वाल्मिक अण्णांवर खंडणीचा गुन्हा वगैरे खोटा आहे. धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदापासून रोखण्यासाठी सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांचा नियोजनबद्ध कार्यक्रम सुरु आहे. त्याच्यात आम्हा गोरगरीब कार्यकर्त्याला त्रास होतो आहे. अण्णा कधीच दोन कोटी रुपये घेऊ शकत नाहीत. असेही मोराळे म्हणाले.
अजितदादा आले त्यादिवशी सकाळी मी..
“जेव्हा अजितदादा आले त्यादिवशी सकाळी मी दौऱ्यात होतो. मित्राच्या गाडीत होतो ब्लॅक स्कॉर्पिओमध्ये होतो. आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत.. दादा येणार म्हटल्यावर आम्ही तिथे जाणारच.” असंही मोराळे यांनी सांगितलं. याशिवाय आपण हीच गाडी सर्व्हिसिंगसाठी छत्रपती संभाजी नगर येथे लाऊन विमानाने नागपूरला गेल्याचं सांगितलं.