लोणी काळभोर : पुणे शहर पोलीस आयोजित आदर्श गणेशोत्सव २०२२ चा पुरस्कार सोरतापवाडी (ता. हवेली) येथील सुदर्शन युवा मित्रमंडळाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आदर्श गणेशोत्सव बक्षीस वितरण पुरस्कार कार्यक्रमाचे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात काल सोमवारी (ता.१७) आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुदर्शन युवा मित्रमंडळाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी मराठी कलाकार प्रविण तरडे, पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णीक, अपर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, हवेली तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब काळभोर आदी उपस्थित होते.
पुणे शहर पोलीस आयुक्तालय विघ्नहर्ता न्यासच्या माध्यमातून पुणे शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांसाठी मानाची आदर्श गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार सोरतापवाडी येथील सुदर्शन युवा मंडळाच्या गणेश फेस्टिव्हलला संपूर्ण पुणे शहरातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांकडून सुदर्शन युवा मंडळाचे भरभरून कौतुक होत आहे.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सोरतापवाडी येथील सुदर्शन युवा मित्रमंडळाला तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, नवनियुक्त पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस हवालदार रामदास मेमाणे, विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त, परीक्षक मंडळातील विशाल वेदपाठक, नितीन करडे, सुनिल होळकर, सचिन झांबरे या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले.