सुरेश घाडगे
परंडा : परंडा येथे मंगळवारी (ता.८) आयोजित केलेल्या सकल मराठा आरक्षण महामोर्चाची जय्यत तयारी जोरदार सुरू असून भव्य सभा मंच उभारण्यात येत आहे.
मोर्चा प्रारंभ व मार्गावर तसेच सभा स्थळी भगवे ध्वज , स्वागत कमानी , फलक आदिमुळे परंडा शहर गजबजून गेले आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक ते कोटला मैदान, रुई रोड सभास्थळ येथपर्यंत मोर्चा पदयात्रा आहे. सभा मंचाच्या उजव्या बाजूला महिलांची बैठक व्यवस्था ,समोरील बाजूस शाळा – कॉलेजच्या मुली , महिला तर डाव्या बाजूला पुरुष बैठक व्यवस्था असेल.
समोरील बाजूस शाळा कॉलेजची मुले, सर्वसामान्य मराठा बांधव व शेवटी पक्ष, संघटनाचे पदाधिकारी, राजकीय बांधव अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. समाजाला संबोधित करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाच मुलींची भाषण नियोजित केले आहे. पाच मुली व महिला मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देतील .