दीपक खिलारे
इंदापूर : जिल्हा परिषद सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे यांच्या मागणीला प्रतिसाद देत इंदापूर पोलीसांनी शहरातील बेशिस्त वाहने, जड वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच जड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
शनिवारी (दि.१०) उसाचा मोकळा ट्रॅक्टर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सानिका राजेंद्र लिके या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील-ठाकरे यांनी शहरातील वाहतुक व्यवस्थेत योग्य ती सुधारणा करावी. यासाठी इंदापूर पोलीस स्टेशनला विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांसमवेत निवेदन दिले होते.
पोलीस प्रशासनाकडून अंकिता पाटील- ठाकरे यांनी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेऊन पोलीस प्रशासनाने बेशिस्त वाहनांवर धडक कारवाई केली. तसेच बेशिस्त वाहन धारकांचे वाहन चालविण्याचा परवाना देखील तपासण्यात आला. या धडक कारवाईमुळे वाहन धारकांची चांगलीच पळापळ झाली. तसेच जड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
अंकिता पाटील-ठाकरे यांनी केलेल्या पाठपुराव्याचे नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.