पुणे : आज तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत, एका शेतकऱ्याची यशोगाथा. शिरूर तालुक्यातील एका अशा शेतकऱ्याची गोष्ट, ज्याने काही गुंठ्यामध्ये कोथिबिरीची लागवड करून लाखो रुपये कमवले आहेत. पुण्यातील शिरूर तालुक्यातील या शेतकऱ्यानं केवळ 50 गुंठ्यात कोथिंबीरीची लागवड करत लाखो रुपयांची कमाई केली आहे. ऑगस्टमध्ये २० किलो कोथिंबीर लावत सप्टेंबरच्या मध्यापर्यंत म्हणजे अवघ्या महिन्याभरात साडेआठ लाख रुपये कोथिंबिरीतून कमावले आहे. शेतकऱ्यानं आणि व्यापाऱ्यानं कोथिंबीरीतून मिळालेल्या फायद्यानं शेतातच गुलाल उधळून आपला आनंद साजरा केला आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी आता आपल्या शेतात वेगवेळे प्रयोग करताना दिसत आहे. पारंपरिक पिकांसह काही कॅश क्रॉपचीही तो आता लागवड करू लागला आहे. टाकळी भीमा येथील प्रयोगशील शेतकऱ्यानंही असाच कोथिंबीर लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला असून लाखोने पैसे कमवले आहे. बाळासाहेब करपे असं यशस्वी शेतकऱ्याचं नाव आहे.
केली तब्बल इतक्या ‘लाखांची’ कमाई..
बाळासाहेब करपे या शेतकऱ्यानं त्याच्या कुटुंबासह ऑगस्ट महिन्यात ५० गुंठ्यात धणा पेरला. पीक बहरल्यानंतर सद्गुरु व्हेजिटेबल कंपनीशी बोलून त्यांनी कोथिंबीरीचा भाव ठरवून घेतला. या कोथिंबीरीला चांगला भाव दिला गेला. ५० गुंठ्यातील कोथिंबीरीतून या शेतकऱ्यानं तब्बल साडेआठ लाख रुपयांची कमाई केली आहे. या पिक काढण्यासाठी या शेतकऱ्याला एकूण ४० हजार रुपये खर्च आला आहे.
५० गुंठ्यातून १५ हजार कोथिंबीरीच्या जुड्या..
पिकाचे योग्य व्यवस्थापन आणि नियोजन केल्यामुळे महिनाभरात या शेतकऱ्याच्या शिवारात ५० गुंठ्यातून १५ हजार कोथिंबीरीच्या जुड्या निघाल्याचं या शेतकऱ्यानं सांगितलं आहे. कमीत कमी खर्चात अधिक उत्पन्न निघणाऱ्या कोथिंबीरीतून या शेतकऱ्याला मोठा फायदा झाल्याचं आता समोर आलं आहे.
या यशामागील रहस्य काय?
शेतकरी बाळासाहेब करपे यांनी बाजारातून अशोका जातीचं कोथिंबीरीचं बियाणं विकत आणलं, स्प्रिंकलर पद्धतीनं पिकाला पाणी देत कोंबड खतही टाकलेलं होतं. वेळोवेळी फवारण्या आणि पाणी दिल्यानं केवळ ५० गुंठ्यातून १५ हजार कोथिंबीरीच्या जुड्या निघाल्या आहेत.