केडगाव : शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या भविष्यातील येऊ घातलेल्या अनेक स्पर्धा परीक्षांचा पाया असतो. शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे बाळकडूच या लहान वयापासूनच मिळत असते. नेमक्या याच बाबींचा पाया पक्का व्हावा, या उद्देशाने पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी राज्यात विविध परीक्षेचे आयोजन केले जाते.
या पार्श्वभुमीवर नुकताच भैरवनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय खुटबाव या विद्यालयाचा आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) या परीक्षेचा निकाल 45.45 टक्के लागला. त्या परीक्षेसाठी इयत्ता 8वी या वर्गातून 55 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 25 विद्यार्थी पास झाले असून 13 विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले. SBC मधून चैतन्य संतोष पळसे हा विद्यार्थी(NMMS) शिष्यवृत्तीसाठी पात्र झाला. सारथी साठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी नऊ हजार रुपये याप्रमाणे सलग चार वर्षे व जिल्हा निवड यादीतील मुलाला दरवर्षी बारा हजार रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे. याचा पुढील शिक्षणासाठी नक्कीच फायदा होणार आहे.
या परीक्षेसाठी शिक्षक हनुमंत थोरात, संतोष थोरात, वीणा ताडगे, राणी मांढरे आणि मनीषा निंबाळकर या सर्व शिक्षकांनी विशेष मार्गदर्शन केले. सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार दौंड तालुक्याचे युवा नेते तुषार थोरात व भैरवनाथ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे, सचिव सुर्यकांत खैरे, खजिनदार अरुण थोरात, प्राचार्य सोमनाथ तांबे यांच्या हस्ते संस्थेच्यावतीने करण्यात आला. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक वृंद आदी विद्यार्थी उपस्थित होते.