लोणी काळभोर : लोणी काळभोर ही ग्रामपंचायत आर्थिकदृष्या खूप मोठी असून पंचायतीच्या अंतर्गत नागरिकांना तब्बल ८३ विविध सुविधा दिल्या जातात. नागरिकांना सुविधा तर हव्या असतात मात्र ते कर भरण्यासाठी टाळाटाळ करतात.
त्यामुळे सुविधा हव्या असतील तर कर भरणे आवश्यक आहे, असा सल्ला जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी दिला.
लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेत नेस्ले कंपनीच्या वतीने बांधलेल्या स्वच्छतागृहाचे हस्तांतरण आयुष्य प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर, लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, साधना सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाष काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही भौतिक सुविधांची निर्मिती करण्यासाठी शासनाला पैशांची आवश्यकता असते. शासन कराच्या स्वरूपात नागरिकांकडून या पैशांची गरज भागवत असते. मात्र अजूनही नागरिक कर देण्यासाठी टाळाटाळ करतात हे सामान्य चित्र आहे.
यामुळे नागरिकांनी योग्य कराचा भरणा केल्यास हाच कररूपी पैसा भौतिक सुविधांच्या निर्मितीसाठी वापरता येऊ शकतो.
प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करावे. कारण कर भरला तर गावाचा विकास शक्य होईल आणि गाव सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून चांगले राहील, असा सल्ला देखील आयुष प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना दिला.
तसेच लोणी काळभोर ग्रामपंचायतीने नागरिकांकडे राहिलेला पाठीमागचा व चालू कर त्वरित वसूल करावा, असे तोंडी आदेश देखील आयुष्य प्रसाद यांच्या वतीने यावेळी देण्यात आले.