जुन्नर : जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक नाणेघाटाजवळ असलेल्या किल्ले जीवधन येथे पर्यटनासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विकी लक्ष्मण राठोड (वय २०, रा. भाटनगर, पिंपरी चिंचवड) असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. २८) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळेगाव या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेले विकी राठोड व त्याचे चार मित्र असे पाच तरुण पर्यटनासाठी गेले होते. शुक्रवारी (दि. २७) श्री क्षेत्र भीमाशंकर येथे देवदर्शन केल्यानंतर या सर्वांनी किल्ले शिवनेरी येथे भेट देऊन संध्याकाळी मित्र अनुराग रघतवान याच्या धामणखेल येथील घरी मुक्काम केला.
त्यानंतर शनिवारी (दि. २८) सकाळी १० वाजता जुन्नर येथून किल्ले जीवधन येथे पर्यटनासाठी गेले. किल्ला पाहून झाल्यानंतर परत खाली उतरत असताना सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान पाय घसरून ५० ते ६० फूट उंचीवरून पडल्याने राठोड याच्या डोके, कंबर तसेच हाताला जबर मार लागला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच जुन्नर वन विभाग, स्थानिक ग्रामस्थ तसेच जुन्नर रेस्क्यू टीमच्या मदतीने राठोड यास स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक रेंगडे यांनी राठोड यास मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.