नाशिक: शाळेतील शिक्षकांवर पालकांचा खूप विश्वास असतो, त्यामुळे पालक बिनधास्तपणे आपल्या मुलांना शाळेत पाठवत असतात. आपली मुलं सुरक्षित राहतील, शिक्षकांकडून त्यांना चांगल्या गोष्टी शिकायाल मिळतील असा विश्वासही पालकांना असतो. पण नाशिकमध्ये एका शिक्षकाने जे केलं ते पाहून कोणाचाही शिक्षकावरील विश्वासाला तडा जाईल. नाशिकमध्ये एका शिक्षकाने तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली आहे. विद्यार्थ्याने वही हरवली म्हणून शिक्षकाकडून बेदम चोप देण्यात आल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष येथील जिल्हा परिषद शाळेत हा भयानक प्रकार घडला आहे. केवळ वही हरवली या शुल्लक कारणास्तव तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केली आहे. जिल्हा परिषद शाळेत आयुष सदगीर हा मुलगा तिसरीत शिकतो. मात्र त्याची वही हरवली म्हणून शिक्षकाने त्याला अमानुषपणे चोप दिला आहे. यामुळे त्याच्या पाठीवर वळही उठले आहेत.
शिक्षकाविरोधात पालकांमध्ये संताप
यामुळे शिक्षकाविरोधात पालकांमध्ये संतापाचे वातवरण असून त्या मुलाच्या पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. शुल्लक कारणांवरुन विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.