पाचगणी : जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचा निषेध म्हणून पाचगणी व परिसर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पाचगणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून, मराठा आरक्षणाला पाठींबा जाहीर करण्यात आला.
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज व गोळीबार केला. यामध्ये अनेक आंदोलनकर्ते, महिला, युवक जखमी झाले. त्याच्या निषेधार्थ पर्यटन नगरी पाचगणी शहरात आज सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आपापली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. बाजारपेठेसह पारशी पॉइंट व टेबल लॅंड पठारावरील सर्व दुकाने बंद असल्याने बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय झाली.
पाचगणी शहर व परिसरातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, सकाळी अकरा वाजता आंबेडकर उद्यानापासून मोर्चास सुरुवात झाली. हा मोर्चा शांततेत पाचगणी बसस्थानकापर्यंत काढण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी मराठा क्रांती मोर्चातील पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाचगणी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.