जमशेदपूर : ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे. इराणी (वय : ८५) यांचे जमशेदपूर येथे सोमवारी (ता. ३१) रात्रीच्या सुमारास निधन झाले असल्याची माहिती टाटा स्टीलकडून देण्यात आली आहे.
जमशेद इराणी हे गेल्या चार दशकांहून अधिक काळ टाटा स्टीलशी संलग्न होते. टाटा स्टीलच्या संचालक मंडळातून जून २०११ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी टाटा स्टीलला विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नावलौकिक मिळवून दिला.
जिजी इराणी आणि खोरशेद इराणी या माता-पित्याच्या पोटी जमशेद इराणी यांचा जन्म २ जून १९३६ रोजी नागपुरात झाला. डॉ. इराणी यांनी १९५६ मध्ये नागपूरच्या सायन्स कॉलेजमधून बीएस्सी आणि १९५८ मध्ये नागपूर विद्यापीठातून भूविज्ञान विषयात एमएससीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी डॉ.इराणी यांनी ब्रिटनमधील शेफिल्ड विद्यापीठातून १९६० मध्ये धातूशास्त्रात पदव्युत्तर आणि १९६३ मध्ये पीएचडी शिक्षण पूर्ण केले.
डॉ. इराणी यांनी १९६३ मध्ये शेफील्डमधील ब्रिटीश आयर्न अँड स्टील रिसर्च असोसिएशनमधून त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. परंतु भारताच्या आश्वासक प्रगतीमध्ये योगदान देण्याची त्यांची इच्छा असल्याने ते टाटा आयर्न अँड स्टील कंपनी (सध्या टाटा स्टील) मध्ये रुजू होण्यासाठी भारतात परतले.
जमशेद इराणी यांनी सुरुवातीला संशोधन आणि विकास प्रभारी संचालकांचे सहाय्यक म्हणून कामकाजाला सुरुवात केली. डॉ. इराणी यांनी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीत १९७८ मध्ये जनरल सुपरिटेंडंट, १९७९ मध्ये जनरल मॅनेजर आणि १९८५ मध्ये टाटा स्टीलचे अध्यक्ष बनले. १९८८ मध्ये टाटा स्टीलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि १९९२ मध्ये व्यवस्थापकीय संचालक झाले. २०११ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.
दरम्यान, स्टील मॅन ऑफ इंडिया म्हणून जमशेद जे इराणी यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख होती. देशभरातून नागरिक त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. इराणी यांच्या पश्चात त्यांची पत्नी डेझी इराणी आणि त्यांची तीन मुले झुबिन, निलोफर आणि तानाज असा परिवार आहे.