मुंबई: शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आणि राज्यमंत्री योगेश कदम आणि आशिष जयस्वाल यांना देण्यात आलेल्या दालनात बदल करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार कदम यांना विधान भवनातून मंत्रालयातील ६२६ ते ६२८ क्रमांकाचे दालन देण्यात आले असून जयस्वाल यांना ३१७, ३१९ आणि ३२१ क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या खातेवाटपानंतर काही दिवसांपूर्वीच मंत्री, राज्यमंत्री यांच्या दालन आणि शासकीय बंगल्यांचे वाटप जाहीर केले. या दालन आणि बंगले वाटपाबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे काही मंत्र्यांच्या बंगले वाटपाच्या निर्णयात तातडीने बदल करण्याचा निर्णय झाला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे त्याच दिवशी काही तासांतच निर्णय बदलला. त्यानंतर आता गुरुवारी राज्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या दालनांमध्ये बदल करण्याचा निर्णय जाहीर केला. यात दालन आणि बंगल्यांची अदलाबदल अद्याप सुरू आहे.
यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे असलेले मंत्रालयातील ३१७, ३१९ आणि ३२१ क्रमांकाचे दालन आता राज्यमंत्री जयस्वाल यांच्याकडे सुपूर्द केले आहे. त्यांच्याकडे याअगोदर मंत्रालयातील विस्तारीत इमारतीतील ६२६ ते ६२८ क्रमांकाचे दालन देण्यात आले होते. मंत्रालयातील हे ६२६ ते ६२८ क्रमांकाचे दालन आता राज्यमंत्री योगेश कदम यांना दिले आहे. त्यामुळे मंत्रालयातील या दालन बदलाची चर्चा गुरुवारी दिवसभर रंगली होती.