पुणे : दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत चालली आहे.आता तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहन धारकांना राज्य सरकार चांगलाच दणका देणार आहे.अशा वाहन धारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्याचा विचार राज्य सरकार करत असून लवकरच याबाबत धोरण आणण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

राज्य शासनाने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र प्रत्येक वाहनाला लागू केले आहे. परंतु ही प्रमाणपत्रं वाहनधारक चुकीच्या पद्धतीने प्राप्त करुन घेतात किंवा ती बोगस असल्याच्या तक्रारीही परिवहन विभागाला मिळाल्या आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहने रस्त्यावर आल्याने वायु प्रदूषणात वाढ होत असल्याचही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे. आपल्या पिढीने भावी पिढीचाही विचार केला पाहिजे. त्या पिढीला शुद्ध हवा मिळावी, यासाठी आत्ताच वायू प्रदूषणावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा कडक नियमांची अंमलबजावणी करणे अपरिहार्य असल्याचे प्रताप सरनाईक
यांनी स्पष्ट केले आहे.








