पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याबाबत विचार सुरू झाला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षाची दहावी आणि बारावीची परीक्षा १५ ते २० दिवसांनी लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जुलैमध्ये होणारी पुरवणी परीक्षा जूनमध्ये घेण्याबाबत चाचपणी सुरू आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थ्याला फेब्रुवारी आणि जून अशा दोन सत्रांमध्ये परीक्षेची संधी मिळणार आहे.
याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, शैक्षणिक धोरणात दहावी आणि बारावीची परीक्षा सत्रनिहाय घेण्याबाबत सुचविले आहे. यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सत्रनिहाय परीक्षा घेण्याची चाचपणी केली. मात्र, त्याऐवजी वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याबाबत त्यांनी नव्याने विचार सुरू केला आहे. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांतून समोर आले आहे. त्यानुसार राज्य मंडळाकडून प्रचलित पद्धतीनुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोनदा घेण्यात येतात. फेब्रुवारी-मार्च सत्रातील परीक्षेच्या निकालात कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारची संधी दिली जाते. त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही उत्तीर्ण होण्याची संधी मिळते.
या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाकडून आगामी फेब्रुवारी-मार्च महिन्यात सुरू होणारी परीक्षा १५ ते २० दिवसांपूर्वी आयोजित करण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. असे झाल्यास, बारावीची परीक्षा वेळेत संपून निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल मे मेहिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा (फेरपरीक्षा/ पुरवणी परीक्षा) होतील. त्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येईल. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना दोन संधी मिळतील.