बापू मुळीक
पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने घेतलेल्या क्रीडामहोत्सवात सांघिक आणि वैयक्तिक क्रीडाप्रकारात आकुर्डी गटातील शाळांनी विजेतेपद पटकावले. सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवस झालेल्या स्पर्धांमध्ये जिल्ह्याच्या विविध शाळांतील सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी खेळाडूंनी जीगरबाज खेळी करीत उपस्थितांची मने जिंकली.
संस्थेतील विविध विद्यालयांच्या वाघोली, खानापूर, आकुर्डी, ओझर, पौड, निमगाव केतकी, सुपे, नसरापूर, न्हावरे असे नऊ गटात कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, या सांघिकसह अॅथलेटिक्सच्या स्पर्धा झाल्या. यामध्ये संस्थेच्या सर्व शाखांमधील सुमारे 15 हजार खेळाडू सहभागी झाले होते. गटस्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेले विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळले.
सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर दोन दिवस सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांचा थरार पहायला मिळाला. अनेक खेळाडूंची चमकदार खेळी, डाव टाकण्याच्या पद्धती, सांघिक एकात्मतेची उपस्थितांनी वाहवा केली.
संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रजिस्ट्रार सिताराम अभंग, अधिक्षक किरण देशपांडे, विशेष कार्यकारी अधिकारी प्रमोद जाधव, अकाऊटंट गोरख सोंडकर, क्रिडा विभागाचे समन्वयक डॉ.योगेश पवार, शाम भोसले, संतोष पठारे, आदिनाथ पाठक, सासवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडीत शेळके, शेठ गोविंद रघुनाथ साबळे फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या राजश्री चव्हाण तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक यांनी या स्पर्धेचे नियोजन केले होते.