पुणे : रेल्वेच्या आयआरसीटीसीमार्फत भारत गौरवची विशेष रेल्वे पुण्याहून कुंभमेळ्यासाठी सोडण्यात येणार आहे. पुढील महिन्यात १५ जानेवारी २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही गाडी पुण्यातून कुंभमेळ्यासाठी सुटणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीचे टुरिझम व्यवस्थापक सुभाष नायर यांनी दिली. केंद्र शासनाच्या ‘देखो अपना देश’ या योजनेअंतर्गत भारतगौरव ही विशेष रेल्वेसेवा सुरू केली आहे.
या सेवेद्वारे देशभरातून आत्तापर्यंत ८६ रेल्वेगाड्या धावल्या आहेत. यामुळे अनेकांना आपल्या देशातील पर्यटनाचा आनंद घेता आला आहे. यातीलच आणखी एक विशेष रेल्वेगाडी येत्या १५ तारखेला पुणे रेल्वेस्थानकावरून कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेशसाठी सुटणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी पुणे रेल्वेस्थानकावर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी पुणे विभागाचे झोनल मॅनेजर गुरुराज सोन्ना उपस्थित होते.
पुणे- हरंगुळ, पुणे-कोल्हापूर विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ
रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पुणे- हरंगुळ, पुणे-कोल्हापूर विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. वाढलेल्या कालावधीमुळे पुणे-हरंगुळ पुणे दैनिक विशेष रेल्वेच्या १८० फेऱ्या होणार आहेत. तर पुणे-कोल्हापूर-पुणे दैनिक विशेष रेल्वे गाडीच्याही १८० फेऱ्या होणार आहेत. तसेच, दौंड-सोलापूर-दौड दैनिक डेमू अनारक्षित विशेष गाडीच्या सुध्दा वाढलेल्या कालावधीनुसार १८० फेऱ्या होणार आहेत.