शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे १ जानेवारी २०२५ रोजी २०७ वा शौर्यदिन साजरा होत आहे. भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने त्यानिमित्ताने बार्टी महासंचालक सुनील वारे व निबंधक इंदिरा आस्वार यांच्या मान्यतेने आणि जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने जयस्तंभाला भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र तसेच अशोकचक्र असलेला निळा ध्वज, जय भीम घोषवाक्य विजयस्तंभाच्या सजावटीत दिसणार आहे.
कोरेगाव भीमा विजयरणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे व रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे यांच्या विशेष प्रयत्नातून या वर्षीच्या सजावटीमध्ये जयस्तंभाला पंचशीलच्या चौकटीत भारतीय संविधानाची उद्देशिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र तसेच वर जय भीम घोषवाक्यासह निळा ध्वज अशा स्वरूपाचा अनोखा संगम दिसणार आहे. भारताचे संविधान हे भारताचा सर्वोच्च कायदा असून संविधान दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वांत मोठे लिखित राष्ट्रीय संविधान असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतीक निळ्या रंगाचा ध्वज आहे. हा ध्वज बाबासाहेबांचे व भारतीय विशेषतः बौद्धांचे प्रतीकसुद्धा मानला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बौद्ध धर्मासंबंधीच्या अनेक ठिकाणी हा ध्वज स्थित असतो. डॉ. आंबेडकर हे समतेचे पुरस्कर्ते होते. निळा ध्वज हा आंबेडकरी चळवळीची अस्मिता मानला जातो. तसेच निळ्या ध्वजास त्यागाचे प्रतीक समजले जाते. या ध्वजावर महान चक्रवर्ती सम्राट अशोकांचे बौद्ध धम्मचक्राचा एक रूप असलेले पांढऱ्या रंगातील अशोकचक्र असते. अनेकदा ध्वजावर ‘जय भीम’ हे शब्द लिहिलेले असतात. यंदा विजयस्तंभाची सजावट भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून करण्यात आली असल्याचे सर्जेराव वाघमारे, विवेक बनसोडे व युवराज बनसोडे यांनी सांगितले.