बीड: केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीड पोलिसांच्या विशेष पथकाला मोठे यश मिळाले आहे. या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीनपैकी 2 आरोपींना पकडण्यात आले आहे. मुख्य आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले (वय 26 रा.टाकळी ता.केज) आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे (वय 23 रा. टाकळी ता.केज) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. संभाजी वायभसे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर गोपनीय माहितीगार नेमून, तसेच तांत्रिक कौशल्याचा उपयोग करत सुदर्शन चंद्रभान घुले आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे यांना अटक केली. त्यानंतर दोघांनाही बीड गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल गुजर, यांच्याकडे पुढील तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.