पुणे : १ जानेवारीला कोरेगाव-भिमा येथे दरवर्षीप्रमाणे विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. या बस काही भागात मोफत बससेवा पुरवतील, असे पीएमपीकडून सांगण्यात आले आहे.
कोरेगांव-भिमा येथे विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यातून तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भीमअनुयायी येत असतात. त्यांच्या सोयीसाठी तसेच येणारी वाढीव प्रवासी संख्या विचारात घेवून पीएमपीएमएलने ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन्ही दिवशी जादा बसेसचे नियोजन केले आहे.
लोणीकंद विभागात सुविधा :
- ३१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४ ते पहाटे ४ पर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान, खंडोबा माळ, चिंचबन, फुलगाव शाळा व पेरणे गाव येथून ७५ मोफत (विनातिकीट) बसचे नियोजन
- १ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ४ ते रात्री १२ पर्यंत तुळापूर फाटा, चिंचवन, लोणीकंद कुस्ती मैदान, खंडोबा माळ, फुलगाव शाळा, पेरणे गाव येथून पेरणे टोल नाकापर्यंत २५० मोफत (विनातिकीट) बसचे नियोजन
शिक्रापूर विभागाची मोफत बससेवा:
- ३१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७ पासून शिक्रापूर रोड, जीत पार्किंग वक्फ बोर्ड, पिंपळे जगताप चाकण रोड ते कोरेगांव भीमा विजयस्तंभपर्यंत १४० बस आणि वढू पार्किंग इनामदार हॉस्पिटल ते वढूपर्यंत १० बसेस अशा एकूण १५० मोफत (विनातिकीट) बसेसचे नियोजन
- १ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ४ ते रात्री १२ पर्यंत शिक्रापूर रोड, जीत पार्किंग वक्फ बोर्ड, पिंपळे जगताप चाकण रोड येथून ३५० बसेस व वढू पार्किंग इनामदार हॉस्पिटल ते वढूपर्यंत ३० बसेस अशा एकूण ३८० मोफत (विनातिकीट) बसेसचे नियोजन
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध स्थानकांवरून प्रवास भाडे आकारणी करून कुस्ती मैदान लोणीकंदपर्यंत जादा बसचे नियोजन
पीएमपीच्या जादा बस धावणार
पीएमपीकडून ३१ डिसेंबर २०२४ व १ जानेवारी २०२५ रोजी मौजे पेरणे फाटा (कोरेगाव भीमा) येथे विजयस्तंभास मानवंदना देण्याकरिता येणाऱ्या अनुयायींसाठी जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहर, शहरांलगतची उपनगरे व पीएमआरडीए हद्दीतील मार्गांवर बसचे प्रमाण कमी राहणार असल्याने प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते.
१ जाने. २०२५ रोजी कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्याकरिता येणाऱ्या अनुयायांची पुणे स्टेशन, ससून रोड व मोलोदिना बसस्थानकावर प्रचंड गर्दी होत असल्यामुळे ससून रोड व मोलोदिना बसस्थानकावरून सुटणारे सर्व बसमार्ग सकाळच्या सत्रात पुणे स्टेशन डेपो बसस्थानकातून संचलनात राहतील व पूलगेटकडून येरवडा, आळंदीकडे जाणारे बसमार्ग जी.पी.ओ., पुणे स्टेशन डेपो, अलंकार टॉकीज मार्गे संचलनात राहतील, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले.