उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील सोरतापवाडी, कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीत सुरु असेलेले नवीन मुळा मुठा कालव्याचे काम सोरतापवाडी (ता. हवेली) येथील ग्रामस्थांनी सोमवारी (ता. ०७) बंद पाडले आहे.
जेष्ठ नेते रामदास चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक चौधरी, राहुल गाढवे, देवेंद्र चौधरी, प्रशांत चौधरी, रणजित चौधरी, बंडोपंत चौधरी, अजिंक्य चौधरी, नाना चोरघे, अमर गाढवे, राजेंद्र चोरघे, भाऊसाहेब चौधरी यांनी हे काम बंद पाडले आहे. सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत तसेच पूर्व हवेलीत कोणत्याही ठिकाणी अस्तरीकरणाचे काम करायचे नाही. तश्या प्रकारचे निवेदन सिंचन भवनला देण्यात आले आहे. त्यांनी निविदा घेतली असून पोहोच दिलेली आहे.
मागील काही दिवसापूर्वी कालव्यात प्रमाणापेक्षा मोठ्या प्रमाणात पाणी झाल्याने पाणी काही गावात शिरले होते. या शिरलेल्या पाण्याच्या अनुशंघाने पाटबंधारे विभागाकडून सदर कालव्याची साफसफाई करण्यात आली. तसेच कालवा स्वच्छ करण्यात आला. मात्र या कालव्याची साफसफाई झाल्यानंतर कालव्याचे सिमेंटच्या माध्यमातून अस्तरीकरण सुरु झाले आहे. त्यामुळे रोपवाटिका व्यवसायिकांना व शेतकऱ्यांना भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, पूर्व हवेलीतूनच महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात रोपे पाठवली जातात. शेतीला जोडधंदा म्हणून पूर्व हवेलीतील सुमारे पाचशे शेतकऱी पुत्रांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून नर्सरी उद्योग सुरू केला आहे. अस्तरीकरणामुळे पाझर तलाव, कुपनलिका, विहरी हे बंद होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोरतापवाडीतील शेतकऱ्यांनी अस्तरीकरणाचे काम बंद पाडले आहे.