जेजुरी, (पुणे) : जेजुरीच्या श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रेला सुरुवात झाली असून यात्रेत सुमारे दोन लाखांवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात मुक्त हस्ताने भंडार खोबऱ्याची उधळण करीत भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. सोमवती अमावस्येनिमित्त भरलेल्या खंडोबा यात्रेत राज्यभरातून भाविक जेजुरीत आले होते. देवाचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी जेजुरी गडावरून करा नदीकडे मार्गस्थ झाला आहे. यावेळी संपूर्ण जेजुरीगड भंडाऱ्याने नाहून निघाला होता.
दरम्यान, उद्या दि. ९ रोजी चैत्र मासारंभ आणि गुडी पाडवा असल्याने भाविकांनी काल रविवारी (दि.७) पासूनच जेजुरीत गर्दी केली होती. आज दिवसभर अमावस्येचा पुण्यकाल असल्याने दुपारी १ वाजता पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आला. पेशव्यांच्या इशारतीत आणि बंदुकीच्या फैरी झाडत सोहळ्याला सलामी देण्यात आली.
पालखीचे मानकरी खांदेकऱ्यांनी देवाची पालखी उचलली. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी बालदारीत नेण्यात आली. देवाच्या सेवेकऱ्यांनी उत्सवमूर्ती पालखीत स्थानापन्न केल्या. आणि निघाला देवाच्या उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी गडकोटाबाहेर पडला. यावेळी देव संस्थान चे मुख्य विश्वस्त, व्यवस्थापक, कर्मचारी उपस्थित होते.
गडावरून सोहळा निघताच हजारो भाविकांनी देवाचे लेन असणाऱ्या पिवळा गर्द भंडाऱ्याची उधळण करीत खंडेरायाचा जयघोष केला. यावेळी देवस्थान विश्वस्तांस शहरातील अठरापगड जाती धर्मातील समाजबांधव ग्रामस्थ पुजारी ,सेवेकरी, मानकरी, खांदेकरी यांनी हा सोहळा याची डोळा याची देहा अनुभवला. कऱ्हा नदीवरील रंभाई शिंपीन या ठिकाणी श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तींना सायंकाळी पाच वाजता कऱ्हा नदीच्या पाण्याने व पंचामृताने स्नान घालून समाज आरती हाेईल.