सोलापूर, ता. ३ : सोलापूर–हैदराबाद महामार्गालगत बोरामणीजवळील मस्के वस्तीवर शुक्रवारी (ता. १) मध्यरात्री भीषण तिहेरी हत्याकांड उघडकीस आले. केवळ दीड एकर जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील आई, मुलगी आणि अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. Solapur Triple Murder Case
बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील मस्के कुटुंब शेतातील घरात राहत होते. उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे गायत्री सुधाकर मस्के (३६), मुलगी प्रियंका (२०) आणि मुलगा शिवराज (१७) हे तिघेही रात्री गच्चीवर झोपले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी गच्चीवर चढून धारदार शस्त्राने त्यांच्यावर सपासप वार केले. Solapur Triple Murder Case

या अमानुष हल्ल्यात गायत्री आणि प्रियंका यांचा जागीच मृत्यू झाला. आई-बहिणीला वाचवण्यासाठी शिवराजने शर्थीने प्रतिकार केला; मात्र हल्लेखोरांनी त्याच्यावरही वार केले. जीव वाचवण्यासाठी तो गच्चीवरून खाली पळाला, तरीही हल्लेखोरांनी पाठलाग करून त्याला गाठले आणि त्याच्यावरही जीवघेणे वार करून त्याची हत्या केली. Solapur Triple Murder Case
या प्रकरणात मृत महिलेचा दीर पप्पू मस्के याच्यावर संशय व्यक्त केला जात असून तो सध्या फरार आहे. घटनेनंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून आरोपीच्या शोधासाठी सहा विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अत्यंत किरकोळ जमिनीच्या वादातून नात्यातील व्यक्तींवरच अशी थरकाप उडवणारी हिंसा झाल्याने परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. Solapur Triple Murder Case







