सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विवाहित महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशातच आता सोलापुरातील बार्शीमध्ये एका विवाहितेचा तिच्या पतीसह तिघांनी मिळून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याबाबत पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या पतीने मेहुण्याने आणि नणंदेने मारहाण केली आणि जबरदस्तीने तिचे मुंडन केलं इतकेच नव्हे तर रागाच्या भरात पतीने तिच्या भुवयांवरून ट्रिमर फिरवून तिचा चेहरा देखील विद्रूप केला. तसेच तिला शिवीगाळ केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. पतीला पीडितेने नणंद आणि मेहुण्याचे अनैतिक संबंध असल्याची माहिती दिल्यानंतर हा सर्व प्रकार घडला.
या तक्रारीनुसार बार्शी शहर पोलिसांनी पती,मेव्हणा आणि नणंद अशा तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.