दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांची तडकाफडकी बदलीवरुन इंदापूरातील सामाजिक संघटना आक्रमक झाले आहेत. त्यांची बदली रद्द करावी यासाठी दि. १९ रोजी सामाजिक संघटना तसेच सर्व सामान्य जनतेसह इंदापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. या आशयाचे निवेदन इंदापूर तहसीलदार यांचेसह संबंधित विभागाला मंगळवारी (दि.१३ ) देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक इंदापूर पोलीस ठाण्यात रूजू झाल्यानंतर त्यांनी रात्रीच्या वेळेस पेट्रोलींग चालू केल्याने चोर्या, दरोडा तसेच इतर बेकायदेशीर व अवैध धंद्याला आळा बसला आहे. त्याचबरोबर त्यांनी दारु, गुटखा, गोमांस, घरफोडी, दरोडा आदी प्रकरणाचा त्यांनी यशस्वी छडा देखील लावला आहे. त्यामुळे तालुक्यातील गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले आहे.
तसेच त्यांनी आपल्या दीड वर्षाच्या कालावधीत पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांच्यात चांगल्या प्रकारे शिस्त लावली आहे. पोलीस खात्याची जनमानसामध्ये प्रतिमा उंचावण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. यामुळे पोलीस ठाण्यात येणार्या सर्वसामान्य माणसांमध्ये पोलीसांविषयी आदर व विश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे. तसेच तालुक्यात सामाजिक सलोखा राखण्याचे काम केले आहे.
पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांची झालेली बदली ही प्रशासकीय बाब असली तरी
उर्वरीत कालावधीसाठी त्यांचेकडेच इंदापूर याठिकाणीच पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार सोपविण्यात यावा. अन्यथा यासंदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक संघटना पत्रकार संघटनांनी दिला आहे.
यावेळी आरपीआयचे इंदापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे, भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तानाजी धोत्रे, लहुजी शक्ती सेनेचे दत्ता जगताप, वडार पँथरचे अनिल पवार, दलित स्वयंसेवक संघटनेचे घनश्याम निंबाळकर या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह पत्रकार संघटनेचे सुधाकर बोराटे, श्रीयश नलवडे, बाळासाहेब सुतार, पल्लवी चांदगुडे, प्रकाश आरडे, शिवाजी पवार व अतुल सोनकांबळे आदी उपस्थित होते.