किन्हवली : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे शहापूर तालुक्यात जलजीवन मिशन योजनेतून मंजूर असणाऱ्या आसनगाव, कळंबे , अघई या तिन्ही योजनाची कामे संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. जीवन प्राधिकरणच्या शहापूर उपविभागात शाखा अभियंता पदे रिक्त असून त्यांच्या जीवावर प्राधिकरणाचे काम सुरू असल्याने जनतेमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणं अधिकाऱ्यांनी व शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
शहापूर तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय कार्यालय आहे. या कार्यालयात केवळ एकच शाखा अभियंता असून अनेक पदे रिक्त आहेत. शहापूर तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशनमधून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर्फे आसनगाव अघई, कळंबे या तीन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत. शहापूर तालुक्यातील आसनगाव अघई, कळंबे या ग्रामपंचायतीच्या पाण्याचा प्रश्न यामुळे सुटणार आहे. मात्र या योजनांची कामे संत गतीने सुरू आहेत. करोड़ो रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे. आजही ह्या नळपाणी योजना झालेल्या नसून जनतेला पाणीटंचाईचे संकट येऊ शकते.
आसनगावसाठी विलास जगताप हे ठेकेदार असून या योजनेसाठी ४०६८ लक्ष निधी मंजूर आहे. कळंबे या योजनेसाठी मेटाबिल्ड कन्स्ट्रक्शन नाशिक हे ठेकेदार असून १४९९ लक्ष इतका निधी मंजूर आहे. तर अघई योजनेसाठी राजू बोरसे हे ठेकेदार असून ९०२ लक्ष इतका निधी मंजूर आहे. या योजना ठराविक वेळेत पूर्ण करण्यासाठी व योजना योग्य रीतीने पूर्ण करण्यासाठी शासनाने तत्काळ कर्मचारी पदे भरणे आवश्यक आहे.