पुणे : राज्यातील उसाचा गळीत हंगाम सुरू होऊन एक महिना झाला आहे. सध्याच्या घडीला १३८ कारखानेच सुरू झाले आहेत. मात्र, साठ कारखान्यांचा गळीत हंगाम अजूनही सुरू होणे बाकी आहे.
साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ६८ सहकारी आणि ७० खासगी, असे एकूण १३८ कारखाने सुरू झाले आहेत. मागील वर्षात याच वेळी राज्यात १५० कारखाने सुरू होते.
यंदा कोल्हापूर विभागात ३२, पुणे विभागात २४, सोलापूर विभागात ३७, अहमदनगर विभागात १५, औरंगाबाद विभागात ११, नांदेड विभागात १६, अमरावती विभागात दोन तर नागपूर विभागात केवळ एकच कारखाना सुरू झाला आहे.
दरम्यान, मागील हंगामात वर्धा, भंडारामध्ये प्रत्येकी एक आणि यवतमाळ आणि नागपुरात प्रत्येकी दोन, असे एकूण सहा कारखाने सुरू होते. पण, आता अमरावती विभागात दोन आणि नागपूर विभागात एक, असे तीन कारखाने सुरू झाले आहेत.
मागील हंगामात सर्वात कमी साखर उत्पादन करणाऱ्या दहा कारखान्यांमध्ये विदर्भातील चार कारखान्यांचा समावेश होता.
त्यात नागपूरमधील मानस ॲग्रो इंडस्ट्रीज, युनिट एक बेला (ता. उमरेड), आणि व्यंकटेश्वरा (मौदा), वर्धामधील मानस ॲग्रो इंडस्ट्रीज, युनिट तीन, भंडाऱ्यातील मानस ॲग्रो इंडस्ट्रीज, युनिट- चार या चार साखर कारखान्यांचा समावेश आहे.