कर्जत: आईवडिलांसोबत आईस्क्रीम खाण्याचा आनंद लुटत असताना बाजूला असलेल्या सरबताच्या गाडीला हात लागल्यानंतर विजेचा झटका बसून सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना कर्जत तालुक्यातील नेरळ गावातील खांडा येथे बुधवारी घडली. रायमिन रफिक खान असे चिमुरडीचे नाव आहे.
नेरळमध्ये बोपेले येथे राहणारी रायमिन खान आपल्या आई-वडिलांसोबत आईस्क्रिम खाण्यास रात्री साडेनऊच्या दरम्यान गेली होती. येथील टीवाले हॉटेलच्या बाजूला आईस्क्रीमच्या गाडीसोबत सरबताची गाडीही उभी होती. यावेळी रायमिन आईस्क्रीम खात असताना तिचा हात सरबताचा गाडीला लागला. सरबताची गाडीवरील सर्व साहित्य बंद होते. मात्र गाडीवरील फ्रीजचा वीजप्रवाह सुरूच होता, त्याचा धक्का रायमिनला बसला आणि ती सरबताच्या गाडीला चिकटली.
खान कुटुंबीयांनी ताबडतोब ती खेचून काढले आणि जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी रायमिनचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. पालकांनी मुलीच्या मृत्यूस सरबताच्या गाडीचालकास जबाबदार धरल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी अकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. प्रभारी पोलीस अधिकारी शिवसजी धावले यांनी घटनास्थळी भेट दिली. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आठ दिवसांतील दुसरी घटना
रायसिन ज्या सरबताचा गाडीला चिकटली त्या गाडीला वीजप्रवाह कोणत्या मीटरमधून झाला होता. बंद असलेल्या गाडीमध्ये वीज प्रवाह कसा आला याचा पोलीस व महावितरणकडून पंचनामा व्हायला, हवा अशी मागणी पालक करीत आहेत. आठ दिवसातील ही दुसरी घटना असून १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा करणाऱ्या मनीष पाटील या १६ वर्षीय मुलाला उघड्या वीज रोहित्राचा धक्का बसला होता.