सांगली : सांगली शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. सावंत प्लॉट भागात राहणाऱ्या एका सहा वर्षीय मुलीचा खेळता-खेळता कापडी बेल्टने गळफास बसून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंजली नितीन खांडेकर (वय- 6) असे या चिमुरडीचे नाव आहे. एका चिमुकल्या जीवाचा अचानक मृत्यू झाल्याने सांगली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी कुटुंबीयांची कसून चौकशी केली. चिमुकलीचा मृत्यू संशयापद तर नाही ना? याची खातरजमा पोलिसांनी केली. मात्र, वैद्यकीय तपासणीतही मुलीचा गळफास बसून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस सावंत प्लॉटमध्ये खांडेकर कुटुंब राहण्यास आहे. नितीन खांडेकर हे मार्केट यार्डात हमालीचे काम करतात. त्यांना मोठी मुलगी अंजली आणि दोन वर्षाचा मुलगा आहे. अंजली ही वसंत प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकते. दुपारी शाळा सुटल्यानंतर ती घरी आली. वडील नितीन हे गावाकडे गेले होते. घरात चिमुकली अंजली, आई, छोटा भाऊ आणि आजी असे चौघेजण होते.
दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अंजलीला टीव्हीवर कार्टून लावून दिले. त्यानंतर आई धाकट्या मुलाकडे लक्ष देत होती. थोड्या वेळाने आई बाहेर आली तेव्हा तिला अंजली ही खुंटीला कापडी बेल्टने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. हे पाहून तिला धक्काच बसला. तिने आरडाओरड करून शेजारील लोकांना बोलवले. त्यानंतर तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत झाल्याचे सांगितले.
या घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांना घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक चेतन माने, पंकज पवार, बिरोबा नेरळे यांनीही सिव्हिल रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी कुटुंबीयांची चौकशी केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीत बेल्टचा गळफास लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. विश्रामबाग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.