लोणी काळभोर : बांगडयाचा माल घेवुन जायचा नाही, अगोदर बचत गटाचे राहिलेले पैसे दे, यावरून सुरु झालेल्या वादारून दोन भावंडांना दोन सख्ख्या बहिणी, दाजी व भाच्याने लाकडी बांबूने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नायगाव रस्त्यावर (ता.23) रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुनशाद सुलतान मणीयार (वय-40), आसमा आफरोज खान (वय-34), सुलतान चाँदसाहब मणीयार (वय 45) व सलमान चॉदसाहब मणीयार (वय-28, सर्व रा. नायगांव रोड, थेऊर, ता. हवेली जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गुलनाज हुसेन फुलारी (वय 32, रा. नायगांव रोड, थेऊर, ता. हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुलनाज व अझमत रफीयोद्दीन तांबोळी हे नात्याने एकमेकाचे भाऊ आहेत. अझमत हा बांगड्याचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. अझमत याने बहिण आसमा खान यांच्या घरी बांगडयाचा माल ठेवला होता.
दरम्यान, अझमतने आसमा खान यांच्या घरी ठेवलेला बांगडयाचा माल घेण्यासाठी गुलनाज व त्याचा भाऊ हारुन हे दोघे गेले होते. तेव्हा फिर्यादी गुलनाज यांची मोठी बहिण मुनशाद मणीयार, तिचे पती सुलतान मणीयार व मुलगा सलमान हे तेथे होते. तेव्हा आरोपी फिर्यादी व त्यांचा भाऊ हारुन यास म्हणाले की, बांगडयाचा माल घेवुन जायचा नाही, अगोदर बचत गटाचे राहिलेले पैसे दे, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच मुनशाद यांनी लाकडी बांबुने मारहण केली व आसमा हिने हाताने मारहाण केली. तर सुलतान व सलमान यांनी शिवीगाळ करुन तुला पाहुन घेतो असे म्हणून दमदाटी केली.
याप्रकरणी फिर्यादी गुलनाज फुलारी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वरील चार जणांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118 (1), 352, 351 (2) (3) 3(5) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश करे करीत आहेत.







