पुणे : ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या कोरेगाव पार्क येथील फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामाच्या फायर अलार्ममध्ये झालेला तांत्रिक बिघाड भारत निवडणूक आयोगाच्या अनुमतीने आणि राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत दुरूस्त करण्यात आला असून सर्व ईव्हीएम यंत्र सुस्थितीत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामात लोकसभा निवडणूकीसाठी वापरण्यासाठी प्रथमस्तरीय तपासणी झालेले ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास या गोदामातील फायर अलार्ममध्ये बिघाड होऊन सायरन अचानक वाजण्यास सुरूवात झाली. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ याची माहिती प्रशासनाला दिली. अग्निशमन सिलेंडर्स तिथे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन वाहनही मागविण्यात आले होते. गोदामाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तपासणी नंतर तंत्रज्ञांनी फायर अलार्ममधील तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकाराची माहिती तात्काळ निवडणूक आयोगाला पाठविण्यात आली व बिघाड दुरुस्त करण्यासाठी परवानगी घेण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे म्हणाले, गोदामात अग्निशमन यंत्रणा आहे आणि कडक सुरक्षा व्यवस्थादेखील आहे. तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या या प्रकाराची माहिती प्रशासनाने निवडणूक आयोगाला दिली असून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमक्ष आवश्यक दुरूस्ती करण्यात आली आहे. सर्व ईव्हीएम यंत्र सुस्थितीत आहे. ईव्हीएम सुरक्षेबाबत प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.