मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत. यामध्ये शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचाही समावेश आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांनी सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकत हॅट्रिक केली आहे. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकसभेत शिवसेनेच्या गटनेतेपदी श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर मावळमधून निवडून आलेल्या श्रीरंग बारणे यांनी प्रतोदपदी निवड झाली आहे.
शिवसेना पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी गटनेता निवडीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर या प्रस्तावाला बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी अनुमोदन दिले. शिवसेना संसदीय समितीची बैठक संसद भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात झाली. या बैठकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या सर्व खासदारांनी एकमताने श्रीकांत शिंदे यांची निवड केली आहे.
शिवसेनेकडून गटनेता निवड प्रक्रिया ही शिवसेना पक्षांतर्गत करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर शिवसेना लोकसभा गटनेतेपदाची अधिकृत निवड प्रक्रिया पार पडणार आहे.