सुरेश घाडगे
परंडा : तालुक्यातील श्रीक्षेत्र सोनारी व कंडारी येथील मंदिरात श्रीकाळ भैरवनाथाचा जन्मोत्सव सोहळा बुधवार (दि.१६) रात्री १२ वाजता मोठ्या उत्साहात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी “भैरवनाथाच चांगभल”चा जयघोष करत हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
श्रीक्षेत्र सोनारी येथील मंदीर श्रीकाळ भैरवनाथाच्या जन्मोत्सवानिमित्त विविध रंगाच्या आकर्षक फुलानी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जन्मोत्सवास महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्रप्रदेश मुंबई पुणे कोल्हापुर, सोलापुर आदी ठिकाणाहुन भाविक दाखल झाले होते.
बुधवारी कार्तिक वद्य अष्टमी दिवशी सकाळी १०.३० वाजता हभप डॉ.जयवंत बोधले महाराज यांचे सुश्राव्य किर्तन झाले. सायंकाळी ६.३० वाजता हभप अपर्णा सहस्त्रबुद्धे यांचा भारुडाचा कार्यक्रम तर रात्री ९ ते ११.४५ हभप राधाताई सानप यांची किर्तन सेवा झाली. त्यानंतर मयुर पुजारी यांनी उपस्थित भाविकांना श्रीकाळ भैरवनाथाचे महात्म्य सांगितले.
रात्री १२ वाजता गुलाल पुष्प उधळण करण्यात आली.त्यानंतर महिलांनी श्री चा पाळणा गायला व आरती नंतर पंचखाद्य प्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी महिलांच्या ओटीत फुलानी सजवलेल्या पाळण्यातील भैरवनाथ ओटीत घालण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्य पुजारी संजय महाराज ॲड.विवेक काळे,समीर महाराज गावातील मानकरी तसेच सेवेकरी महिला भाविक भक्त, ग्रामस्त उपस्थित होते.
कार्तिक वद्य नवमी गुरुवारी (दि.१७) श्रीकाळ भैरवनाथास पुजारी संजय महाराज यांच्या हस्ते ब्रम्हवृंदाच्या उपस्थितीत लघुरुद्राभिषेक घालण्यात आला तर दुपारी १२.३० वाजता महानैवद्य,आरती करुन भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला व सेवेकरी यांना बिदागी वाटप करण्यात आली.
तालुक्यातील श्रीक्षेत्र कंडारी नगरीतील श्रीकाळभैरवनाथ जन्माष्टमी निमित्त बुधवार दि . १६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . रात्री ९ वाजता किर्तनकार ह.भ.प. वैजीनाथ थोरात महाराज हिंगोलीकर यांचे कीर्तन झाले.गायनाचार्य ह.भ.प. अंगद ढोले (घोडेगावकर),गायनाचार्य ह.भ.प. दत्ता चव्हाण आळंदीकर यांनी सेवा दिली .जन्मोत्सव सोहळा रात्री १२:०० वाजता उत्साहात साजरा झाला .