लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गावचे ग्रामदैवत असणाऱ्या श्रीमंत अंबरनाथ मंदिरात कालाष्टमीच्या निमित्ताने श्री काळभैरव अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी (ता.१६) पहाटे ५ वाजता श्रीमंत अंबरनाथ व माता जोगेश्वरीला भाविकांच्या उपस्थितीत महामस्तकाभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी ७ ते ९ या दरम्यान १०१ दांपत्याच्या हस्ते लघुरुद्र अभिषेक व होम हवन होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान सिताराम भजनी मंडळाच्या वतीने श्री तुलसीदास रामायणाचे पठण होणार असून राजस्थानी सत्संग भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होणार आहे. श्रीमंत अंबरनाथ भजनी मंडळ यांचेही भजन होणार आहे. दुपारी १२ वाजता सत्यनारायण महापुजा करण्यात येणार असून सायंकाळी ६ ते ९ वाजण्याच्या सुमारास मंदिरात हजारो दिवे लावून दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
रात्री दहा वाजता ह. भ. प. दत्तात्रय महाराज काळभोर यांचे जन्मोत्सवाच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून बरोबर मध्यरात्री बारा श्रीमंत अंबरनाथाचा जन्मोत्सव साजरा होणार आहे.
दुस-या दिवशी गुरुवारी (ता. १७) सकाळी ८ ते ११ या काळात श्रींची पारंपारिक शाही मिरवणूक काढण्यात येणार आहे तर दुपारी १२ ते ४ या वेळेत रामेश्वर सारडा व राजू चौधरी यांच्या वतीने भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचे आयोजन लोणी काळभोर ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट व श्रीमंत अंबरनाथ मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले असून सदर कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन देवस्थान ट्रस्ट, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत श्री काळभैरवनाथ अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर म्हणाले, “सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गावचे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे हा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. मात्र, यावेळी कोणतेही बंधन नसल्याने हा उत्साह नेहमीप्रमाणे उत्साहात साजरा करताना आनंद होत आहे.