लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर गावठाणातील जिल्हा परिषद शाळेसही RO मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. तेथीलही विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळणार असून तारमळा जिल्हा परिषद शाळेसही पुढील काही दिवसात RO मशीन मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन थेऊर ग्रामपंचायतीचे सदस्य युवराज काकडे यांनी केले.
थेऊर (ता. हवेली) येथील श्री. चिंतामणी विद्यालयास आदर पुनावाला यांच्या मातोश्री स्व. विलू सायरस पुनावाला फाऊंडेशन कडून शुद्ध पिण्याच्या पाण्याचे RO मशीन देण्यात आले. याचा लोकार्पण व उदघाटन सोहळा ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी काकडे बोलत होते.
यावेळी आदर पुनावाला क्लीन सिटीचे मुख्य-व्यवस्थापक कृष्णण कोमंडूर, उप-व्यवस्थापक मल्हार करवांदे, प्रकल्प प्रमुख रवींद्र ढोणे, क्षेत्र-व्यवस्थापक निलेश रामेकर, विठ्ठल काळे, राहुल कांबळे, शरद काकडे, सुखराज कुंजीर, पांडुरंग काकडे, प्राचार्य बाळासाहेब नेवाळे, प्राध्यापक मधुकर खरात, जीवन शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.
यापुढे बोलताना युवराज काकडे म्हणाले, “गेली अनेक दिवसांपासून श्री.चिंतामणी विद्यालयातील, अंदाजे ७०० ते ८०० विद्यार्थ्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता. विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नेवाळे यांनी वेळोवेळी थेऊर ग्रामपंचायतकडे पाठपुरावा केला होता. केलेल्या पाठपुराव्यास यश येऊन विद्यालयास RO मशीन उपलब्ध झाले आहे. यावेळी आदर पूनावाला टीमसह गावातील सर्वांचेच यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले आहे.”
दरम्यान, या RO मशिनच्या माध्यमातून विद्यालयास, दररोज ५०० लिटर शुद्ध फिल्टर केलेले पाणी मिळणार आहे. बटन दाबल्यानंतर विध्यार्थ्यांना १०० मि.ली. पासून १ लिटर पर्यंत पाणी मिळणार आहे. हडपसर येथील सिरम कंपनीमधून फिल्टर केलेले पाणी, विद्यालयात दररोज येऊन भरले जाणार आहे. RO मशीनच्या पाण्याची पातळी ८०% पर्यंत गेल्यास, अँटोमॅटिक सेन्सरच्या माध्यमातून, सिरम कंपनीस याची माहिती मिळेल, माहिती मिळाल्यानंतर काही वेळात, कंपनीच्या टँकर मधून RO मशीनला पाणी पुरवठा केला जाईल. आभार युवराज काकडे यांनी मानले.