जालना : जालना जिल्ह्यातुन धक्कादायक बातमी समोर आली आहे. नववीच्या वर्गात का बसला म्हणून, शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना जालन्यातील शहागड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली असून, या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, जालन्यातील शहागड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला शुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली असून, विद्यार्थ्याचे केस ओढत भिंतीला डोके आपटले. या धक्कादायक प्रकरणानंतर विद्यार्थ्याने पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
विद्यार्थ्याने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, विद्यार्थी नववीच्या वर्गात बसला होता. इयत्ता नववीच्या वर्गात का बसलास? म्हणत विद्यार्थ्याला हातावर आणि मांडीवर अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मुख्याध्यापकाने वर्गातच विद्यार्थ्याला मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. नंतर मुख्याध्यापकाने केस ओढत विद्यार्थ्याचे डोके भिंतीला आदळले. नंतर मांडी आणि गालावर देखील बेदम मारहाण केली आहे.
विद्यार्थी गंभीर जखमी
मुख्याध्यापकाने केलेल्या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्यानं ताबोडतोब घर गाठत यासंदर्भातली माहिती कुटुंबाला दिली. त्यानंतर कुटुंब आणि विद्यार्थ्याने जालन्यातील गोंदी पोलिस ठाणे गाठत मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुख्याध्यापक आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.